मराठी चित्रपट 'दे धक्का'

मराठी चित्रपट 'दे धक्का'
De Dhakka
प्रस्तुती: झी टॉकिज
दिग्दर्शक: सुदेश मांजरेकर - अतुल काळे
छायाचित्रणः शैलेश अवस्थी
संगीत: अजीत-अतुल-समीर
कलाकार: मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा, सिद्धार्थ जाधव
'साडे माडे तीन'च्या यशानंतर झी टॉकिज घेऊन आले आहेत 'दे धक्का'. 'साडे माडे तीन' बेतलेला होता हिंदी चित्रपट 'चलती का नाम गाडी' वर तर 'दे धक्का' वर प्रभाव आहे २००६ साली ऑस्करच्या शर्यतीत असणा-या 'Little Miss Sunshine'ची.

आता हे इतर चित्रपटापासून 'प्रभावित' होऊन मराठी चित्रपट बनवणे अयोग्य हा वाद नक्कीच उद्भवतो. पण ह्या बरोबरच एक मुद्दा आणखी असतो कि तो चित्रपट आहे. ह्याचे श्रेय जेवढे मूळ इंग्लिश चित्रपटाच्या कथेला जाते तेवढेच ते झी टॉकिजच्या टीमचे हि आहे. हॉलिवूड च्या कथेला खास मराठी बाज चढवण्याचे. हे कथा आहे जाधव परिवाराची. एका असा परिवार ज्याच्यासमोर आहेत अनेक अडचणी. ह्या परिवारात आहेत सुभानराव (शिवाजी साटम), त्याचा मुलगा मकरंद (मकरंद अनासपुरे), मकरंदची बायको सुमी (मेधा) आणि सुमीचा भाऊ धनाजी (सिद्धार्थजाधव).

चित्रपटाच्या सुरुवातीलाच परिवारातील प्रत्येकाची अगदी खुमासदार ओळख करुन देण्यात येते. मकरंद एक मॅकॅनिक, ज्याने आपले सर्वस्व एक शोधण्याच्या पायी खरच केला आहे, केवळ एका आशेवर की तो शोध त्याला भरपूर पैसे मिळवून देईल. आणि ह्याच कारणामुळे सुभानराव मकरंदवर नाखुश आहेआणि त्याची परिणिती होते त्याच्या दिवस रात्री दारु पिण्यात. ह्या गोष्टीमुळे बाप लेकाचे नाते फारच बिघडलेले आहे. दुसरी कडे मकरंदच्या मुलांची ही स्वतःची स्वप्ने आहेत. त्याच्या मुलाला व्हायच आहे जगद्जेता पहिलवान तर मुलीची इच्छा आहे एक नृत्यांगना बनायचे. भरिस भर म्हणून मकरंदचा मेहूणा धनाजी ह्याला एक आजार आहे 'Kleptomania'(क्लिप्टोमेनिया) आणि ह्या सर्वांना खुष ठेवण्यासाठी बिचारी सुमी धडपडत असते. परंतू हे सर्व बदलते जेव्हा सायलीची निवड एका नृत्य स्पर्धेच्या अंतिम फेरी साठी होते आणि सर्व जाधव परिवार निघतो मुंबईकडे तेही एका टमटम मधून .... ह्या प्रवासादरम्यान त्यांच्या समोर अनेक अडचणी येतात पण हे कुटुंब त्या सर्वांवर मात कशी करते आणि त्याच बरोबर त्यांच्यातली नाती पुन्हा कशी गवसतात हा या कथेचा गाभा...

चित्रपटाचा पुर्वार्ध अगदी मनाची पकड घेणारा आहे. जाधव कुटुंबाची प्रेक्षकांना ओळख करून देताना गंभीर आणि विनोदी प्रसंगाचा उत्तम समतोल साधला आहे. परंतू मध्यांतरानंतर चित्रपट थोडा ढिला पडतो चित्रपटाची कथा नक्कीच वेगळी आणि चांगली आहे पण पटकथा थोडी निराशा करते. पोलिसांच ेचित्रिकरण तर अगदी हास्यास्पद आहे. धनाजीला मल्टीपल पर्सनालिटी डिसऑर्डरचा आजार आहे असे दाखवण्यात आले आहे पण पुढे त्याचा काहिच वापर केला नाही. मकरंद आणि सुभानराव ह्यांच्यातला वाद पण उत्तरार्धात एकसुरी वाटतो. आणि मुंबईमधे एका नृत्य स्पर्धेत प्रेक्षक लावणी चालू झाल्यावर त्याच्या विरोधात गोंधळ घालतील असे मला तरी वाटत नाही.

लेखक आणि दिग्दर्शकांनी ह्या आणि अशा आणखी काही त्रुटींवर नक्कीच लक्ष्य केंद्रीत करायला हव होत. चित्रपट मनात भरतो तो उत्तम अभिनयामुळे. सर्वांचा अभिनय चांगला आहे. परंतु शिवाजी साटम यांचा सुभानराव थोडा एकसुरी झाला आहे. सिद्धार्थ जाधव यांचा अभिनय एकदम उत्स्फुर्त. तो पडद्यावर असताना एक क्षणही कंटाळवाण होत नाही. चित्रपटाचे पार्श्वसंगीत ही जमेची बाजू आहे. तरी काही ठिकाणीते थोड कानठाले बसवणारे वाटते...चित्रपटातली गाणी ही सुंदर आणि साधी सोपी आहेत, विशेषतः 'दे धक्का' तर एकदम साजेसे आहे.

एकुणच 'दे धक्का' का एक चांगला चित्रपट आहे. जास्त विचार न करता एकदा मजा घेण्यासारखा एक अनुभव.....